पंडीत गंगाधरराव भोसले  
974 Followers · 998 Following

Joined 31 July 2020


Joined 31 July 2020

पेटला आहे वणवा ऊसाचा,
सोयाबीन वाहून गेले सारे..
पक्षाचे झेंडे ठेवा बाजूला,
आता तरी तुम्ही जागे व्हा रे..

ऊस परीषद झाली आता,
मशाल क्रांतीची पेटवु या रे..
खडबडून उठेल महाराष्ट्र सारा,
अन् पेटतील प्रभावती चे निखारे...

विवंचनेत आहे पोशिंदा जगाचा,
एल्गार क्रांतीचा पुकारू या रे..
जातपात धर्म पंथ ठेवु बाजूला,
शेतकरी म्हणून संघर्ष करू सारे..

नसानसातुन वाहतील तुमच्या,
परीवर्तनाचे विद्रोही वारे..
गुराढोरा सगट पेटून उठतील,
शेतकर्यांची बायका पोरे........ ✍
🙏🙏 पंडित गंगाधराव भोसले 🙏🙏

-



सत्ताधार्यांना झाला कोरोना,
विरोधक महापुरात बुडला..
पीकविमा तरी मिळेल कसा,
केंद्राचा जीव अंबानीशी जडला...

अंगणात आलेला पाहूणा,
आज तांडव करून गेला..
डोळे झाकले सरकारने,
शेतकरी हवालदिल झाला...

धो धो पडणार पाऊस आज,
त्याच्या सर्वांगाला बोचु लागला...
सोयाबीन कापसाचे कोंभ बघतांना,
माझा बाप बांधावर नाचु लागला...

सोयाबीन कापूस ज्वारीचा,
त्याच्या उभ्या शेतात सडा झाला..
ऐन दिवाळीच्या दिवसात बापाने,
बोंबलुन शिमगा साजरा केला....... ✍
🙏 पंडित गंगाधरराव भोसले 🙏




-



किती केले रं तांडव,
बाप झालाय रांडव...
करपलं रान सार..
सांग कोणाला भांडाव...

खरडलंं धान सार,
नाही मातीचा आधार..
राख रांगोळी झाली,
कोणी देईना उधार..

गडाडलं ढग सारं,
भडा भडा रीचवलं..
नाही बसलं नदीत,
शेत शिवारी घुसलं..

नाही बांधला ही माती,
नाही गोठ्यातली ढोरं...
नाही बापाला आधार,
वैरी झालय सरकार...
🙏 पंडित गंगाधरराव भोसले 🙏



-



किती कष्टलीस माय,
किती खाल्ल्यास खस्ता..
बाप मोटच्या नाड्यावर,
घट्टे ढोपरासी बसता...

हाती खुरप्याची मुठ,
मुखातून गाते ओवी..
सुखी ठेव धनी मवा,
जिंदगी संग ही सरावी...

बाप वखराव ऊभा,
घाम गाळीतो शेतात..
माय वेची काड्या मुड्या,
काटे रूतती हातात...

बाप जगाचा पोशिंदा,
माय अन्नपूर्णा देवी..
अर्ध्या पोटाने उपाशी,
प्रेम अंकुरे पालवी...

🙏पंडित गंगाधरराव भोसले🙏

-



अटळ हाय संघर्ष उद्याचा,
एक एक माणूस जोडून ठेव..
गंजली तलवार मावळ्या तुझी रं..
तलवारीला धार तुझ्या लावून ठेव...

भ्रष्टाचारी झालेत पुढारी सारे,
तोफेला बारुद तुझ्या भरून ठेव...
पैशाने झालीय लाचार ही जनता....
स्वाभिमानी बाणा तुझा जागृत ठेव...

व्यवस्थेची लाथ हाय माथ्यावर तुझ्या,
पाताळात गाडतील जरा ध्यानात ठेव,
कुणब्याच्या पोरांनीच क्रांती केलीय,
शिवबाचे विचार जरा आचरणात ठेव..

🙏🙏 पंडित गंगाधरराव भोसले 🙏🙏







-



माणूस माणसात नाही,
देव देवळात कुठे..
कुंपण शेत खातय बघा,
कलीयुगीचे चित्र उफराटे...

राज्यकर्ते झाले षंड,
लाचार झाली जनता,
कार्यकर्ते झाले गुंड,
राजा नाही जाणता...

परेशान आहे सत्य आज,
लबाडांचा झाला बोलबाला..
सत्ता संपत्ती च्या बळावर,
अकार्यक्षम आज पुढे आला..

परेशान आहे सत्य आज
पराजित मात्र नक्कीच नाही..
मानव जातीच्या राजहंसा तु,
क्षीर आणि नीर शोधून घेई....
🙏 पंडित गंगाधरराव भोसले 🙏

-



हा देश माझा शुर वीरांचा,
निधडी छाती रणरंगधिरांचा,
या मातीला तहान रक्ताची,
शुर बलीदानी क्रांतिकारकांचा..

या देशाच्या कामी आली,
स्वराज्यास्तव जनता झुंजली,
ती जनता होती रंजली गांजली,
हीच शहीद चरणी श्रध्दांजली...

तिरंगा हा स्वाभिमान आमुचा,
धडा गीरवु आम्ही समानतेचा,
स्वातंत्र्य न्याय बंधुभावाने जगु,
मार्ग खरा हा लोकशाहीचा........ ✍
🙏 पंडित गंगाधरराव भोसले 🙏

-



माणूस माणसात नाही,
निसर्गाने का रहावे...
कधीतरी माणसाने स्वतःचे,
प्रतिबिंब आरशात पहावे..

झाड वेली फुले तोडून,
धरा तुम्ही नागविली...
निसर्ग संपत्ती झोडुन तुम्ही,
सिमेंट ची जंगले उभी केली...

नदी नाले ओढे रोखुन,
निसर्गाची कोंडी केली..
डोंगर कपारी फोडून तुम्ही,
निसर्गाची चंडी केली...

एक ना एक दिवस तुझी,
कृत्रिम संपत्ती लयाला जाईल..
तेंव्हा ही धरा अमानवी कृत्याने,
जिकडे तिकडे जलमय होईल...... ✍
🙏 पंडित गंगाधरराव भोसले 🙏





-



श्रावण मासी उगवला शशी,
आनंदाला उधाण चढे...
क्षणात येती भरभर जलधारा,
सुर्य प्रभेस ही स्फुरण चढे....

धरा नेसली हिरवा शालू,
चराचर हे उजळले सारे...
जिकडे तिकडे हिरवळ दाटली,
जणू भू वरी स्वर्गची आवतरे....

बहरल्या या नाना वृक्ष वेली,
बहरले नाना रंगी पाने फुले..
पशुपक्षी नाचती बागडती,
उचंबळला सागर पर्जन्य जले...

-



#इंद्रायणी...
खेळलो बागडलो कुशीत माते,
अंनदाचे सदाच उधाण...
उगम पावली माळावरती,
इंद्रायणी देवी नामाभिधान...

खळखळ धावत सुटसी वेगे,
सळसळ नागीण धावते जणू...
नाना रंगी रंगलो तुझ्या,
सप्तरंगी भाससी जसा इंद्रधनू....

अविट गोडी तुझ्या जीवनाची,
मानस कन्या तु गोदावरीची...
हिरवा निसर्ग फुलला सभोवती,
साडी नेसली शुभ्र श्वेत जरीची...

सहवास तुझा हवाहवासा वाटे,
आजही थांबतो दोन क्षण तेथे...
पवित्र माती ती वृंदावनाची,
दर्शन मात्रे चित्त शुद्ध होते..... ✍

-


Fetching पंडीत गंगाधरराव भोसले Quotes